ऐहोळे येथील मंदिर स्थापत्य शास्त्राची प्रयोगशाळा बघितल्या नंतर मी निघालो चालुक्य राजवटीच्या राजधानीचे दुसरे शहर अर्थात पट्टदकल या गावी, याचा नेमका उच्चार कसा करायचा हेच मला कळत नव्हते त्यामुळे इंग्रजी pattadakal चा सरळ मराठी अनुवाद केला. पाठीवर एकच सॅक असल्यामुळे तसा म्हणायला गेल्यावर कुठेही फिरण्यास मोकळा होतो. ऐहोळे बघून बाहेर येणाऱ्या प्रत्येकास रिक्षावाल्यांनि गराडा घालून पट्टडकल येणार का असा एकच गलका सुरु केला. मी अगोदर ठरवून ठेवलेले वाक्य "आताच आलोय" सांगून सुटका करून घेतली. ऐहोळे ते पट्टदकल हे अंतर १६ किमी असून तुम्ही रिक्षा किंवा मग बस असे दोन्ही पर्याय निवडू शकता. मी एकटा असल्यामुळे बस चा पर्याय निवडून बस ची वाट बघत तिथेच ऐहोळे येथील चौकात चहा घेतला. लगेच बस आल्यानंतर मग पट्टदकल ला निघालो. २०-२५ मिनीटात आपण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या या चालुक्यांचा द्वितीय राजधानीत पोचतो. या ठिकाणी हिंदू आणि जैन मंदिरांचा समूह आहे, बहुतेक मंदिरे शैव आहेत पण विष्णु या देवतेलाही मानाचे स्थान दिलेले आहे. येथील प्रमुख मंदिरांमध्ये आहेत
१. विरुपाक्ष मंदिर
२. मल्लिकार्जुन मंदिर
३. जंबुलिंगेश्वर मंदिर
४. संगमेश्वर मंदिर
५. काशी विश्वनाथ मंदिर
६. चंद्रशेखर मंदिर
७. गलगनाथ मंदिर
८. पापनाथ मंदिर
९. जैन मंदिर
पूर्ण मंदिर परिसर पाहण्यासाठी २-३ तास पुरेसे आहेत, येथे फिरताना मंदिर स्थापत्य कला कशा प्रकारे विकसित झाली याची आपल्याला कल्पना येते.
No comments:
Post a Comment