Monday, 20 April 2020

ऐहोळे

ऐहोळे :

बेलूर, हळेबिडू, बेलवाडी, दोड्डागड्डावेल्ली आणि अर्शिकेरे येथील होयसाळ राजवंशाच्या काळातील मंदिरे बघून झाल्यानंतर त्या आठवणी जागवत बदामी या चालुक्यांच्या राजधानी कडे गोल गुम्बज या एक्सप्रेस ट्रेन ने निघालो, ट्रेन अर्शिकेरे वरून रात्री १० ला सुटते व बदामी मध्ये सकाळी ६:३० ला सोडते, बदामी रेल्वे स्टेशन हे बदामी शहरापासून अंदाजे २-३ किमी लांब आहे. रेल्वे स्टेशन वरून बदामी शहरात जाण्यासाठी टमटम माणसी १० रु.  घेतात. मी टमटम पकडून बदामी बसस्टॅण्ड मध्ये आलो तिथून मी बुक केलेले हॉटेल KSTDC चे हॉटेल मयुरा चालुक्य हे बसस्टॅण्ड पासून अंदाजे १.५-२ किमी होते. एका मोटरसायकलला स्वाराने लिफ्ट दिली हॉटेल पर्यंत. हॉटेल रूम वर जाऊन आंघोळ करून तिथे उपलब्ध असलेला नाश्ता केला आणि लगेच ऐहोळे-पट्टडकल-बदामी-बनशंकरी या क्रमाने सगळी ठिकाणे बघायचे निश्चित करून हॉटेल मध्येच असलेल्या ट्रॅव्हल डेस्क वर कार रेंट चार्जेस विचारले, त्याने एका माणसाचे ही सगळी ठिकाणे दाखवायचे १८०० रुपये सांगितले. मी गूगल वर शोध घेतला असता सगळ्यात लांब ठिकाण हे ऐहोळे हे फक्त ३५ किमी लांब होते आणि बाकीचे ठिकाणे परत यायच्या मार्गावरच होती. बसस्टॅण्ड वर जाऊन ऐहोळे या ठिकाणी जाण्यासाठी बस आहे कि याची चौकशी केली असता १५ मिनिटात बस सुटणार आहे हे कळले मग सरळ बस मध्ये जाऊन बसलो ३५ रुपयांचे तिकीट काढून प्रवास आरंभ केला.
बदामी ते ऐहोळे हा रस्ता बाकी कर्नाटक मध्ये असलेल्या रस्त्या प्रमाणे छान आहे.


आता थोडे ऐहोले विषयी इसवी सनाच्या ५ व्या ते ८ व्या शतकापर्यंत चालुक्य राजवटीची राजधानी असलेले हे आजचे एक शांत खेडेगाव त्या काळातील महत्वपूर्ण राजधानीचे शहर होते आणि या ठिकाणावरूनच चक्क इराणशी म्हणजेच त्या काळच्या पर्शियाशी या राजवटीचा व्यापारउदीम चालत होता. संपूर्ण ऐहोळे गाव तुम्हाला पुरातात्विक दृष्ट्या अनमोल अश्या विविध मूर्ती आणि वस्तूंवर वसलेले दिसेल. गावात कोणाच्या अंगणात काही खांब दिसतील तर काही ठिकाणी जुन्या वास्तूचा उपयोग गावकरी त्यांच्या दैनंदिन कामासाठी करत असताना दिसतात. ऐहोळे हे खऱ्या अर्थाने भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्राची प्रयोगशाळा आहे हे म्हणाले तर वावगे ठरणार नाही एवढी विविध आकाराची मंदिरे या ठिकाणी ५-८ शतकात बांधली गेली आणि त्यातूनच भारतीय मंदिराची स्थापत्य शैली विकसित झाली.






















Sunday, 19 April 2020

हळेबिडू (द्वारसमुद्र)

बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर संध्याकाळी आणि सकाळी अश्या दोन्ही वेळेस बघून झाल्यानंतर मी निघालो होयसाळ साम्राज्याची राजधानी असलेली प्राचीन द्वारसमुद्र नगरी आणि आताचे गाव हळेबिडू, द्वारसमुद्र हे नाव मागे पडून हळेबिडू (उध्वस्त शहर) हे नाव या शहराला पडण्यामागे कारण आहे ते दिल्लीच्या मुस्लिम आक्रमकांनी लढाई नंतर केलेला या राजधानीचा विध्वंस. असे सांगितले जाते कि या एकाच शहरात किमान ८०० मंदिरे होती आणि एक प्रशस्त मोठा तलावही होता, आता ना ती ८०० मंदिरे आहेत ना तलाव हि अगोदरच्या दिमाखाने आहे. भर दुपारी मी मंदिराच्या प्रागंणात पोचलो, तिथेच बाजूला पुरात्तव खात्याने सापडलेल्या मूर्तींचे एक संग्रहालय उभारले आहे. त्या संग्रहालयाच्या प्रांगणात बाहुबली सदृश एक मूर्ती ठेवली आहे. होयसाळ राजे हे हिंदू, जैन या दोन्ही धर्माचे पालक असल्यामुळे हळेबिडू मध्ये हिंदू मंदिरासोबत जैन मंदिरे पण आहेत.





मी मंदिर परिसरात भर दुपारी पोचलो त्यामुळे गर्दी कमी होती खुप, बूट काढून ठेवल्या मुळे पाय भयानक भाजत होते परंतु मंदिराच्या प्रदिक्षणा मार्गावर सतरंजीच्या पट्ट्या ठेवल्यामुळे गैरसोय होत नव्हती. संपूर्ण मंदिरावर शिखर नाहीये त्याचा विध्वंस केला गेला त्याची ती एक खूण आहे.

हे मंदिर द्विकूट म्हणजेच दोन मुख्यदेवताचे गाभारे ह्या प्रकारातील असून होयसाळेश्वर या नावाने एक शिवलिंग आणि गाभारा आहे आणि शांतालाश्वर या नावाने दुसरा गाभारा आहे, दोन्ही गाभाऱ्याच्या बाहेर पूर्व दिशेला दोन मोठाले नंदी असून त्यान्ची उंची ६-७ फूट एवढी आहे, नंदी विराजमान असलेली जागा गोलाकार खांब असलेल्या मंडपाने आच्छादित आहे. 




मंदिराची रचना हि तारकाकृती आहे त्यामुळे शिल्पकारांना मंदिरच्या बाह्य अंगावर आपली शिल्पकला दाखवण्यासाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध झाली आणि त्या उपलब्ध जागेच एवढा सुंदर उपयोग तुम्हाला जगात कोठेही आढळणार नाही, रामायण, महाभारत तसेच पुराणातील प्रसंगावर या ठिकाणी शेकडो शिल्पकृती केलेल्या दिसून येतात, रावण आपली पूर्ण ताकत लावून कैलास पर्वत उचलतोय तो प्रसंग तर एवढ्या बारकाईने घडवला आहे कि आपण त्यातील डिटेल्स बघून अचंबित होतो, पर्वत रावणाने उचलल्या मुले कललेली पार्वती, तिला धरून ठेवलेला शिव, आकाशातुन बघणारे देवगण, कैलास पर्वतावरील वृक्ष, प्राणी या सगळ्यांचे अगदी यथार्त रूप येथे शिल्पकाराने कोरले आहे.













वर दाखवलेल्या फोटो मध्ये गजासुर वधाची गोष्ट शिल्पकाराने इतकी अकल्पनीय डिटेल्स मध्ये दगडामध्ये कोरली आहे कि आपण अचंबित होऊन जातो गजासुराचे पॉट फेडताना दाखवताना शिवाच्या बोटांची नखे सुद्धा शिल्पकाराने दाखवली आहेत.

मंदिराचे द्वारपाल एवढे अलंकृत आहेत कि त्यांना पाहतच बसावे असे वाटते, त्यांचे हात जरी विध्वंसकर्त्यानी तोडले असले तरी त्यांचे खंडित रूपहि मनाला भुरळ पाडते. मंदिर निवांत ३-४ तास बघून झाल्यानंतर मी होयसाळेश्वर मंदिरापासून अंदाजे १ किमी अंतरावर असलेल्या जैन मंदिरांना आणि तिथून पुढे ५०० मीटर अंतरावरील केदारेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी निघालो.

होयसाळ राजवंशाने हिंदू आणि जैन या दोन्ही धर्माना राजाश्रय दिलेला होता याची प्रचिती येते ती येथे असलेल्या शांतीनाथ, पार्श्वनाथ आणि आदिनाथ यांच्या जैन मंदिरांनी. मंदिरामध्ये होयसाळ शिल्पकलेचे वैशिष्ट्य असलेली नक्षीदार गोलाकार खांब सोबतच आहे पार्श्वनाथांची आणि शांतीनाथांची १८ फूट उंच मूर्ती.








जैन मंदिर बघून झाल्यानंतर तिथून जवळच असलेले केदारेश्वराचे मंदिर पण बघितले. सध्या पूजा अर्चा बंद असलेले पण पूर्ण बाह्यभागावर शिल्पकलेने समृद्ध केदारेश्वर मंदिर बघून हळेबिडू ला पुन्हा भेटूच असे म्हणून निरोप दिला.




पुढचा स्टॉप होता अर्शिकेरे, तिथून मग बदामी ला जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती, अर्शिकेरे या ठिकाणी पण कलमेश्वराचे होयसालकालीन मंदिर आहे, ते मंदिर बघून मी बदामीला निघालो.







Wednesday, 15 April 2020

बेलूर (चेन्नकेशवा मंदिर)

बेलूर चे  चेन्नकेशवा मंदिर म्हणजे भारतीय शिल्पकलेचे अत्युच्च शिखर. जी शिल्पकला आणि कोरीवकाम पहिले होते ते शब्दात मांडणे माझ्या सारख्या पामराला अशक्य कोटीतील काम आहे. त्या मंदिरातील शिल्पकला आणि कोरीवकाम हे फक्त प्रत्यक्ष बघूनच अनुभवण्यासारखे आहे. मी माझ्या मोबाइल ने फोटो काढले पण मोबाईल सुद्धा त्यांच्या सुंदरतेला न्याय देऊ शकला नाही. जर तुम्हाला इतिहासात आणि प्राचीन स्थापत्यशास्त्रात आवड असेल या मंदिराला तुमच्या यादीमध्ये अग्रक्रमांकावर ठेवा कारण अनुभव हीच खात्री आहे.



आता थोडे या मंदिराविषयी: या मंदिराची स्थापना हि होयसाळ साम्राज्याचा महाराजा विष्णूवर्धन याने १११७ साली केली, गाईड असे सांगत होता कि हे मंदिर पूर्ण बांधण्यासाठी १०३ वर्ष लागली आणि त्या राजाच्या ३ पिढ्या लागल्या मंदिर पूर्ण होईपर्यंत. असे हे सुंदर मंदिर मुस्लिम आक्रमकांच्या तावडीत त्या वेळच्या सद्यपरिस्थिती मुळे पडले आणि आक्रमक होता मलिक काफूर (तोच पद्मावत सिनेमात दिसलेला नपुंसक गुलाम ज्याच्यावर अल्लाउद्दीन खिलजी चे विशेष प्रेम होते) ज्याने देवगिरीचे यादव, वरंगळ चे काकतीय, द्वारसमुद्राचे होयसाळ आणि मदुराईचे पांड्य या सगळ्या राजघराण्यांचा शेवट केला. मलिक काफूर च्या आक्रमणाच्या वेळेस संपूर्ण मंदिर वाळूत लपवले गेले आणि मलिक काफूर च्या सैन्याने फक्त गोपुरांचा विध्वंस करून आपला मोर्चा राजधानी द्वारसमुद्र कडे वळवला. आता दिसत असलेले गोपुर हे नंतर १५व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेलेले आहे.






आता शिल्पकले विषयी: या मंदिरात जे सुंदर आणि बारीक कोरीवकाम केले गेलेले आहे ते संपूर्ण जगात कुठेही दिसणे निव्वळ अशक्य आहे मग ती आरश्यात बघणारी दर्पण सुंदरी असो कि हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पॉट फाडणारा नृसिंह असो. नृसिंहाच्या मूर्तीमध्ये तर हिरण्यकश्यपूच्या पोटातील आतडे, नखे, टोकदार जीभ हि सगळे इतक्या परिपूर्ण पद्धतीने दाखवले आहे कि आपण अचंबित होतो. तीच गोष्ट गजासुराच्या वधाची, यात महादेव गजासुराचे पॉट फाडून तांडव करतोय असे दाखवले आहे.










































कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग दोन

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग एक बँकॉकहून Giant Ibis बस ने निघालेला मी त्या पोई पेटच्या बदनाम बॉर्डरवरचा इंटरव्ह्यू, कंबोडियन इमिग्रेशनची त...