ऐन दिवाळीत कुठे सहलीला जाणे म्हणजे सुखातला जीव दुःखात घालणे, असे माझ्या बऱ्याच मित्रमंडळींना वाटत असते. "दिवाळीत घरात राहायचं, फराळ खायचा, नातेवाईकांना भेटायचं, एवढं पुरेसं नाही का?" असा त्यांचा कायम प्रश्न असतो. पण खाजगी नोकरी करणाऱ्यांच्या आयुष्यात सलग सुट्ट्या म्हणजे एखाद्या ग्रहणानंतर दिसणाऱ्या धूमकेतूसारख्या. वर्षभर वाट बघायची आणि मिळाल्या तर त्या दिवाळीतच. त्यामुळे माझी जी काही फिरायची बकेट लिस्ट आहे, ती एक एक करून पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या सुट्ट्यांपेक्षा योग्य वेळ दुसरी असूच शकत नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे.
यावर्षी कुठे जायचे याचा विचार सुरू झाला तेव्हा मनात पहिल्याच क्रमांकावर आले ते बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. "लोणार" हा शब्द मी पहिल्यांदा शाळेत भूगोलाच्या पुस्तकात वाचला होता. त्या वेळी पुस्तकातली एक छोटीशी माहिती वाचून एवढेच वाटले होते की, आपल्या महाराष्ट्रात असे काहीतरी वेगळे आहे. पण वर्षानुवर्षे ती गोष्ट मनाच्या एका कोपऱ्यात साठून राहिली होती. आता ती प्रत्यक्ष पाहायची वेळ आली होती.
विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार, सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी एका प्रचंड अशनीच्या पृथ्वीवरील आघातामुळे हे विवर तयार झाले. बेसॉल्टच्या खडकामध्ये तयार झालेले अशा प्रकारचे हे जगातील अत्यंत दुर्मिळ विवर आहे आणि त्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतो. विचार करा, जगभरात अशा प्रकारची विवरे बोटावर मोजण्याइतकी आहेत आणि त्यापैकी एक आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. आपल्या आजूबाजूला किती मोठी नैसर्गिक आश्चर्ये आहेत याची जाणीव अशा ठिकाणी गेल्यावरच होते.
तर अशा या लोणार सरोवराला भेट देण्यासाठी दिवाळीच्या सकाळी चाकणहून आरामात दहा वाजता प्रस्थान केले. पहाटे तीन-चारला उठून निघण्याचा माझा स्वभाव नाही. सुट्टी म्हणजे निवांतपणा. त्यामुळे चहा पिऊन, गाडीची एकदा तपासणी करून निवांत प्रवास सुरू झाला.
चाकणच्या बाहेर पडून नाशिक रोडला लागल्यानंतर भामा नदीच्या काठावर असलेले हॉटेल तुलसी हे नाश्त्यासाठी अगदी परिपूर्ण ठिकाण आहे. चव, स्वच्छता आणि किफायतशीर दर यांचा छान समतोल या हॉटेलने साधला आहे. गरमागरम पोहे, उपमा आणि चहाचा आस्वाद घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला. रस्त्यावरच्या प्रवासात अशी छोटी पण मनाला समाधान देणारी ठिकाणेच आठवणीत राहतात.
शिर्डीच्या दिशेने गाडी धावत होती. शिर्डीतून जाताना साईबाबांना गाडीतूनच हात जोडले. गर्दी, पार्किंग आणि रांगेचा वेळ या वेळी टाळायचा होता. पुढे समृद्धी महामार्गावर चढण्याआधी "स्वागत" नावाचे एक हॉटेल दिसले. मनात विचार आला की, एकदा महामार्गावर गेल्यावर फारशी चांगली जेवणाची ठिकाणे मिळणार नाहीत, त्यामुळे येथेच जेवून घेऊ.
एकटा असल्यामुळे सरळ व्हेज थाळीची ऑर्डर दिली. थाळी म्हणजे दोन-तीन भाज्या, डाळ, भात, चपात्या, लोणचे, पापड असे सगळे एका ताटात. एकट्या माणसासाठी त्यापेक्षा उत्तम पर्याय कोणता? पण तेथील वेटरने जे कारण सांगितले ते ऐकून मी काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिलो.
तो म्हणाला, "आम्ही एकट्या व्यक्तीला व्हेज थाळी देत नाही."
मी म्हटलं, "का बरं?"
त्यावर त्याचे उत्तर होते, "एका व्यक्तीसाठी थाळी बनवायची म्हणजे कूकला वेगवेगळ्या भाज्या कराव्या लागतात. ते आम्हाला परवडत नाही."
हे तर्कशास्त्र ऐकून माझ्या रागाचा पारा म्हणजे सिस्टोलिक प्रेशर दोनशेच्या पुढे गेला. आयुष्यात अनेक विचित्र कारणे ऐकली होती, पण "एकटा असल्यामुळे थाळी मिळणार नाही" हे पहिल्यांदाच ऐकत होतो. मग त्याचा आणि त्याच्या मॅनेजरचा यथोचित शब्दसत्कार करून काहीही न खाता बाहेर आलो.
गाडीत बसलो आणि बायकोने सोबत दिलेल्या दिवाळी फराळाची पिशवी उघडली. चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळे… एका मागोमाग एक संपवत बसलो. एक गोष्ट मात्र खरी, बायकोने केलेल्या कोणत्याही पदार्थाची मनापासून प्रशंसा केली की संसारात शांतता टिकून राहते. हा माझ्या वैवाहिक जीवनातला अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सिद्ध झालेला निष्कर्ष आहे.
फराळावर ताव मारून समृद्धी महामार्गावर गाडी दाखल झाली. पुन्हा एकदा मनोमन देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. आपण कितीही राजकारणावर टीका केली तरी अशा दर्जेदार पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या की त्याचे कौतुक करावेच लागते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरसुद्धा मी सहसा ऐंशी ते शंभरच्या वेगापलीकडे गाडी नेत नाही. पण समृद्धी महामार्गावर नकळत स्पीडोमीटर एकशेवीसवर स्थिरावला होता. रस्ता इतका रुंद, गुळगुळीत आणि सरळ आहे की कोणालाही गाडी दीडशे-दोनशेवर न्यायचा मोह होऊ शकतो. या महामार्गावर तुमच्या ड्रायव्हिंग स्किलपेक्षा संयमाची जास्त परीक्षा होते.
माझी गाडी मात्र सतत कुजबुजत होती, "चल... अजून थोडा वेग वाढव."
पण मी स्पीडोमीटरची सुई एकशेवीसवरच रोवून ठेवली.
(संयम वगैरे काही नव्हता. गाडी एकशेवीसवर होती आणि त्यापुढे न्यायची हिंमत होत नव्हती.)
असा हा अतिप्रचंड वेग धारण करून संध्याकाळी लोणार गावात प्रवेश केला. गावात पोहोचताच गाडीची चाके थेट दैत्यसूदन मंदिराकडे वळली. गाडी पार्क केली आणि पावले आपोआप मंदिराच्या प्रांगणात गेली.
हे चालुक्यकालीन मंदिर आहे. आज त्याचा मूळ कळस अस्तित्वात नाही, पण उरलेली वास्तूही आजच्या काळात थक्क करून सोडते. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात पुरातन दगडी मंदिरे पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. दगडांच्या रंगात बदल होत जातो, सावल्या लांब होत जातात आणि हजार वर्षांपूर्वीचे कारागीर आपल्या समोर उभे राहिल्यासारखे वाटते.
या मंदिराच्या शिल्पकलेबद्दल मी पामर काय बोलणार? इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, "A picture is worth a thousand words." इथे तो अगदी तंतोतंत लागू पडतो. प्रत्येक खांब, प्रत्येक शिल्प, प्रत्येक कोरीव काम इतक्या बारकाईने केलेले आहे की कितीही वेळ पाहिले तरी मन भरत नाही.
अंधार पडायला लागल्यावर जवळच असलेल्या एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. रिसॉर्टचे लोकेशन अप्रतिम आहे. सभोवताली शांत परिसर, झाडांची गर्दी आणि अगदी जवळ लोणार सरोवर. पण देखभाल मात्र अगदी सरकारी पद्धतीची वाटली. थोडे लक्ष दिले तर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन निवासांपैकी एक होऊ शकते, असे सारखे वाटत राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वीच उठलो. लोणार सरोवराचे पहिले दर्शन हा संपूर्ण प्रवासातील सर्वात खास क्षण होता. विवराच्या मध्यभागी पसरलेले हिरवट पाणी, सभोवती उभ्या असलेल्या उंच कडा आणि त्याभोवतीची घनदाट झाडी, हे दृश्य काही क्षण शांत उभे राहूनच अनुभवावे लागते.
सरोवराच्या काठावर जाण्यासाठी खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना वाटेत अनेक प्राचीन भग्नावस्थेतील मंदिरे दिसली. काही मंदिरांवर अजूनही सुंदर कोरीवकाम टिकून आहे, तर काही काळाच्या ओघात पडझड झालेली आहेत. पण प्रत्येक मंदिर एक गोष्ट सांगत असते. हजारो वर्षांचा इतिहास या परिसरात अक्षरशः विखुरलेला आहे. दुर्दैव एवढेच की, या ठिकाणाची माहिती आणि जतन या दोन्ही गोष्टींकडे अजूनही अपेक्षित तेवढे लक्ष दिले गेलेले दिसत नाही.
लोणार हे फक्त एक सरोवर नाही. तो भूगर्भशास्त्र, इतिहास, पुरातत्त्व, निसर्ग आणि अध्यात्म यांचा विलक्षण संगम आहे. महाराष्ट्रात राहूनही आपण अनेकदा परदेशातील नैसर्गिक चमत्कारांचे कौतुक करत बसतो, पण आपल्या घरापासून काही तासांच्या अंतरावर जगभरात दुर्मिळ मानले जाणारे असे एक आश्चर्य शांतपणे आपली वाट पाहत उभे आहे. आणि म्हणूनच, माझ्या बकेट लिस्टमधला आणखी एक महत्त्वाचा टिकमार्क दिवाळीच्या या प्रवासामुळे पूर्ण झाला
.png)
.png)


















































