Friday, 17 July 2026

सुखोथाई: एक अनपेक्षित भेट

हल्ली लिहिणं खूपच कमी झालंय. जगरहाटी, कामधंदा, आणि या सगळ्या गडबडीत लिहायला बसणं होत नाही. पण खूप दिवस मनात घोळत असलेला हा अनुभव आज मांडतोच माझ्या अचानक ठरलेल्या सुखोथाई भेटीचा वृत्तांत. थायलंडची पहिली प्राचीन राजधानी. जिचं नाव मला महिन्यापूर्वीपर्यंत माहीतच नव्हतं.

Wat Traimit सोनेरी बुद्ध आणि त्याची अफलातून कहाणी

तर झाले असे की बँकॉकला गेलो होतो. जगरहाटीप्रमाणे तिथल्या प्रसिद्ध बुद्धमंदिरांच्या यादीत एक नाव होतं Wat Traimit. म्हणजे सोनेरी बुद्धाचं मंदिर. चायनाटाऊनच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधून वाट काढत तिथे पोचलो.

आत गेलो आणि थबकलो.



समोर होती सुमारे चार मीटर उंच, साडेपाच टन वजनाची, शुद्ध सोन्याची बुद्धमूर्ती  जगातली सर्वांत मोठी भरीव सोन्याची बुद्धमूर्ती. त्या सोनेरी प्रकाशात उभं राहताना काय वाटलं हे शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. इतकी भव्य, इतकी शांत मूर्ती माझ्या पाहण्यात यापूर्वी कधी आली नव्हती.

पण या मूर्तीचं खरं वैशिष्ट्य तिचं सौंदर्य नाही तिचा इतिहास आहे.







मंदिराच्याच खालच्या मजल्यावर एक छोटंसं museum आहे. सहसा लोक मूर्ती पाहून निघतात, museum कडे फारसं कोण लक्ष देत नाही. पण मी आत शिरलो आणि जे वाचलं ते थक्क करणारं होतं.

ही मूर्ती मूळची सुखोथाई या थायलंडच्या पहिल्या राजधानीत तयार झाली, तेराव्या शतकात. नंतरच्या काळात बर्मीज आक्रमकांपासून वाचवण्यासाठी कोणा अज्ञात भिक्षूने तिच्यावर प्लास्टर आणि रंगीत काचेचा जाड थर चढवला. बाहेरून दिसायला एखाद्या साध्या, राखाडी बुद्धमूर्तीसारखीच. कोणाला काहीच संशय येणार नाही असं.

पण ती गुपित त्या भिक्षूबरोबरच गेलं. पुढच्या जवळपास दोनशे वर्षांत कोणालाच माहीत नव्हतं की त्या साध्या दिसणाऱ्या मूर्तीच्या आत खरं काय आहे. ती मूर्ती एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात हलवली जात होती, कोणी विशेष लक्षही देत नव्हतं.

मग आला १९५५ चा तो अपघात.

मूर्ती नव्या जागी हलवताना ती खाली पडली. प्लास्टर तडकलं. आणि त्या तडकलेल्या भेगांमधून आतून एक सोनेरी चमक बाहेर आली.

हजारो वर्षांचं गुपित एका अपघाताने उघड झालं होतं.

विशेष म्हणजे हा शोधही अनेक थाई बौद्ध श्रद्धाळू एका चमत्काराप्रमाणे पाहतात. कारण १९५५ हे वर्ष भगवान बुद्धांच्या जन्माच्या २५०० व्या जयंती वर्षाच्या उत्सवाची सुरुवात मानली जात होती. ज्या वर्षी संपूर्ण बौद्ध जगत बुद्धांच्या २५०० व्या जन्मवर्षाचं स्मरण करत होतं, त्याच काळात शतकानुशतकं प्लास्टरच्या आवरणाखाली लपलेली ही शुद्ध सोन्याची बुद्धमूर्ती पुन्हा जगासमोर आली. अनेकांच्या दृष्टीने हा केवळ योगायोग नव्हता, तर बुद्धांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त घडलेला एक चमत्कारच होता.

एक फलक आणि बदललेला सगळा प्रवास

Museum मध्ये फिरताना एका कोपऱ्यात एक फलक दिसला. Sukhothai Kingdom. थायलंडची पहिली राजधानी. थाई कला, संस्कृती, भाषा, बौद्ध धर्म आणि थाई लिपी या सगळ्यांचा उगम एकाच ठिकाणी. इ.स. १२३८ ते १४३८ या काळात दोनशे वर्षे नांदलेलं एक भव्य साम्राज्य.

मी थांबलो. पुन्हा वाचलं.

थायलंडला येणारे बहुतांश पर्यटक बँकॉकचे Grand Palace, Pattaya चे बीचेस आणि Phuket चे नाईटलाईफ यातच थायलंड संपवतात. या देशाची खरी मुळे कुठे आहेत हे शोधायला कोण जातं?

मोबाईल काढला, गुगल केलं Sukhothai Historical Park. UNESCO World Heritage Site. बँकॉकपासून सुमारे चारशे किलोमीटर, सहा-आठ तासांचा प्रवास.

माझ्या कोणत्याही itinerary मध्ये सुखोथाईचं नाव नव्हतं. पण त्या museum मधून बाहेर पडेपर्यंत मनाने निर्णय पक्का केला होता जायचंच.

इतिहास असाच असतो. तो तुमची वेळापत्रक, तुमचा बजेट, तुमची योजना — काहीही विचारत नाही. तो फक्त एखाद्या छोट्याशा फलकावर उभा राहतो आणि खुणावतो. आणि मग तुम्ही चालत सुटता.

बस, बससुंदरी आणि थाई जेवण

दुसऱ्याच दिवशी सकाळी बँकॉकच्या Mo Chit bus terminal वर पोचलो. सुखोथाईला जाणारी बस. तिकीट किंमत  सुमारे ३०० Thai Baht, म्हणजे आपले नऊशे रुपये. बँकॉक ते सुखोथाई चारशे किलोमीटरसाठी नऊशे रुपये आपल्या ST बस वाल्यांनी जरा धडा घ्यावा इथून.



बस होती दुमजली, आरामशीर आणि विमानात जशा हवाई सुंदरी असतात तशाच बससुंदरी होत्या. प्रत्येक प्रवाशाला बसल्याबरोबर पाण्याची बाटली, केक आणि कुरकुऱ्यासारखे स्नॅक दिले गेले. आता सांगा आपल्या ST बस मध्ये कोण देतो हे? उलट आपल्याकडे आपण खाऊ नाही घेतला तर बसमधूनच पोट रिकामं राहतं.

सकाळी नऊला निघालेली बस दुपारी जेवणासाठी एका ठिकाणी थांबली. तिथे थाई व्यंजनांची एक आरास मांडलेली होती  विविध प्रकारच्या थाई करीज, भात, सूप. आणि हे जेवण तिकिटाच्या किमतीतच! मी जेवत असताना मनात आलं मुन्शी प्रेमचंद यांच्या 'कफन' मधला तो माधव आठवतो का? "इतना खाया की पानी न पिया गया!"  सेम विथ मी.

खिडकीबाहेर थायलंडचा तो खरा चेहरा दिसत होता tourist brochures मध्ये नसतो तो. भाताची हिरवीगार शेतं, छोटी छोटी गावं, रस्त्याकडेचे बौद्ध पॅगोडा. बँकॉकची गर्दी, गोंगाट आणि नियॉन लाईट्स मागे पडत होत्या आणि थायलंड हळूहळू अधिक शांत, अधिक खरा होत होता.

सुखोथाई सुखाचा उगम



संध्याकाळी सुखोथाईला पोचलो. Historical Park च्या अगदी जवळ हॉटेल बुक केलं होतं. रात्री आराम केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजताच उठलो कारण उन्हं डोक्यावर यायच्या आत जास्तीत जास्त फिरायचं होतं.

Sukhothai Historical Park मध्ये प्रवेश केला आणि श्वास रोखला गेला. विस्तीर्ण, हिरवागार परिसर. मध्येमध्ये शांत तलाव. त्यांच्या काठावर झाडांच्या सावलीत शेकडो वर्षांपूर्वीच्या मंदिरांचे अवशेष काही अखंड उभे, काही अर्धवट ढासळलेले, काही फक्त खांब शिल्लक. आणि त्या अवशेषांमध्ये जागोजागी बुद्धाच्या मूर्ती — बसलेल्या, उभ्या, शांत, अचल.

हे आपल्या हंपी सारखंच आहे UNESCO World Heritage Site. एकूण पाच झोन — पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य.

आता इथे एक छोटीशी कबुली द्यायला हवी.

पार्कात शिरताना सायकल भाड्याने मिळते चोवीस तासांसाठी फक्त तीस Baht म्हणजे नव्वद रुपये. मी मनात म्हटलं, "व्वा! काय स्वस्त! सायकलवरून फिरूया, व्यायामही होईल आणि निसर्गही जवळून पाहता येईल." सायकल घेतली आणि पेडल मारायला सुरुवात केली.



पंधरा मिनिटांत कळलं की हे आपलं काम नव्हे.

थायलंडचं ते उष्ण, दमट वातावरण आणि त्यात सायकल माझी अवस्था काय झाली असेल हे सांगणे नको. घामाच्या धारा, श्वास वर-खाली. मी गुपचूप सायकल त्या रेंटवाल्याकडे परत घेऊन गेलो. तो माझा तो घामाघूम अवतार बघून हसत हसत म्हणाला "Electric golf cart?" मी मान हलवली. त्याने सायकल स्टँडला लावली, माझे तीस Baht परत दिले आणि शेजारच्या golf cart वाल्याकडे पाठवलं. तिथे अडीचशे Baht दिले आणि मग खऱ्या अर्थाने सुखोथाई सुरू झाली.

Electric golf cart मधून त्या शांत, विस्तीर्ण परिसरात फिरताना एक वेगळाच आनंद होता. झाडांच्या सावलीतून, तलावांच्या काठाने, मंदिरांच्या अवशेषांमधून वाट काढत जाताना वाटलं हे ठिकाण "सुखोथाई" म्हणजे "सुखाचा उगम" का म्हटलं गेलं असेल याचा अनुभव आत्ता होतोय.



Wat Mahathat : सुखोथाईतलं सर्वांत मोठं मंदिर. मुख्य स्तूपाभोवती छोटे स्तूप, आणि मध्यभागी कमळावर विराजमान एक बुद्धमूर्ती  चेहऱ्यावर इतकी खोल शांतता की काही वेळ तिच्यासमोर उभं राहिलो आणि स्वतःचाच आवाज बंद झाला.












Wat Si Chum  एका बंदिस्त मंडपाच्या भिंतींमधून एक प्रचंड बुद्धाचा चेहरा डोकावतो. त्या जड, दाट भिंतींमधून फक्त तो एकच शांत, विशाल चेहरा बाहेर येतो  हे दृश्य पाहताना अंगावर काटा उभा राहतो.








Wat Sorasak

सुखोथाई ऐतिहासिक उद्यानातील हे आकाराने लहान पण अतिशय देखणं मंदिर आहे. इ.स. १४१२ च्या सुमारास अयुथया काळात याची निर्मिती झाली. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मुख्य चेडीच्या पायथ्याशी कोरलेले २४ हत्ती. जणू हे हत्ती संपूर्ण स्तूप आपल्या पाठीवर उचलून उभे आहेत, असा भास होतो.






Wat Si Sawai

सुखोथाईमध्ये फिरताना Wat Si Sawai हे मंदिर पाहिलं आणि काही क्षण मी शांतच उभा राहिलो. दूरून पाहिलं तर तीन ख्मेर शैलीतील प्रांग असलेलं हे मंदिर इतर बौद्ध मंदिरांपेक्षा वेगळंच दिसतं.



इतिहास वाचायला सुरुवात केली आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली.

हे मूळचं हिंदू मंदिर होतं. बहुधा भगवान शिवाला समर्पित. नंतर सुखोथाई साम्राज्यात थेरवाद बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आणि या मंदिराचं रूपांतर बौद्ध मंदिरात झालं. आजही त्याच्या स्थापत्यात हिंदू आणि बौद्ध परंपरांचा सुंदर संगम दिसून येतो.

हे वाचताना माझ्या मनातला एक जुना समज तुटला.

धार्मिक स्थळांचं रूपांतर हा इतिहास फक्त हिंदू आणि मुस्लिम समाजापुरता मर्यादित आहे, असं मला वाटायचं. पण Wat Si Sawai ने दाखवून दिलं की सत्ताबदल, राजकीय बदल आणि धार्मिक परिवर्तन यांच्या प्रक्रियेत अशा घटना जगभर, अनेक संस्कृतींमध्ये आणि विविध धर्मांमध्ये घडल्या आहेत. इतिहास एका धर्माचा नसतो, तो माणसांचा असतो.

फिरता फिरता मनात विचार येत होता  जर त्या museum मध्ये तो एक फलक नसता, जर थांबलो नसतो, जर वाचलं नसतं तर हे सगळं कधीच दिसलं नसतं. बँकॉकचे Grand Palace, रिव्हर क्रूझ, चायनाटाऊनचं जेवण हे सगळं मिळवलं असतं, पण थायलंडच्या खऱ्या आत्म्याला स्पर्शच केला नसता.

एक धडा  पुन्हा एकदा

या अचानक ठरलेल्या सुखोथाई भेटीने मला पुन्हा एकदा तेच शिकवलं 

कधी कधी सर्वोत्तम प्रवास तेच असतात जे तुम्ही ठरवत नाही. जे घडतात.

हातात फक्त मोबाईल, इंटरनेट कनेक्शन आणि थोडंसं धाडस बस, इतकंच पुरतं. बाकी जग स्वतःच तुम्हाला दाखवत राहतं.

अर्थात, सायकल न चालवता electric golf cart घेणं हा शहाणपणा त्यात गणला पाहिजे का हे मात्र तुम्हीच ठरवा. 

No comments:

Post a Comment

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग दोन

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग एक बँकॉकहून Giant Ibis बस ने निघालेला मी त्या पोई पेटच्या बदनाम बॉर्डरवरचा इंटरव्ह्यू, कंबोडियन इमिग्रेशनची त...