कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग एक
बँकॉकहून Giant Ibis बस ने निघालेला मी त्या पोई पेटच्या बदनाम बॉर्डरवरचा इंटरव्ह्यू, कंबोडियन इमिग्रेशनची ती चौकशी हे सगळं दिव्य पार करून शेवटी कंबोडियाच्या मातीत होतो. बस पुढे निघाली बाहेरचा परिसर बघत बघत पुढे जात होतो, बॉर्डरवरचा तो इमिग्रेशन इंटरव्ह्यू संपला, शेवटी स्टॅम्प पडला आणि मी परत बसमध्ये येऊन बसलो. बाकी सगळे प्रवासी आधीच येऊन बसले होते माझी वाट पाहत. थोडं ओशाळल्यासारखं वाटलं, पण तसं दाखवलं नाही.
बस निघाली.
आणि लगेचच एक गोष्ट जाणवली कि ड्रायव्हिंग साईड बदलली. आता पर्यंत थायलंड मध्ये आपल्या प्रमाणे स्टेरिंग व्हील उजव्या बाजूला होते पण येथे कंबोडिया मध्ये ते युरोप अमेरिकेप्रमाणे प्रमाणे डाव्या बाजूला होते
शेवटी विचार केला बॉर्डर ओलांडली की वाहतुकीचे नियम बदलत असतात आणि रस्त्यांचे पण, रस्त्याची अवस्था थायलंडच्या त्या गुळगुळीत, आरशासारख्या रस्त्यांवरून आलेलो मी आता हे पाहून जरा सावरून बसलो. आदळआपट नाही म्हणता येणार नाही, पण थायलंडशी तुलना करायची नाही असं ठरवलं आणि खिडकीबाहेर पाहू लागलो.
बाहेर पसरलेली होती कंबोडियाची विस्तीर्ण, अथांग भातशेती. क्षितिजापर्यंत फक्त हिरवं. थायलंडच्या शेतांसारखंच, पण इथे त्या हिरव्यात एक वेगळाच भकासपणा होता. कदाचित मनाचा खेळ असेल पण त्या शेतांकडे पाहताना मनात विचार आले ते पोल पॉट याचे.
कंबोडियाच्या मातीत जन्मलेला, कंबोडियाच्या माणसांनीच निवडलेला एक नेता ज्याने १९७५ ते १९७९ या केवळ चार वर्षांत आपल्याच देशातल्या वीस लाखांहून अधिक माणसांना ठार मारलं. शिक्षित माणसं, डॉक्टर, शिक्षक, कलाकार जे कोणी चष्मा घालतो तो बुद्धिजीवी, त्याला संपवा असा त्याचा राक्षसी विचार. शहरे रिकामी करा, माणसांना शेतात राबवा, एक शुद्ध कृषीसमाज निर्माण करा हे त्याचं स्वप्न.
या एकाच विकृत विचारासाठी लाखो निरपराध माणसांनी जीव गमावले. त्या भातशेतींनाच Killing Fields म्हटलं गेलं कारण त्याच शेतांच्या मातीखाली हजारो निरपराध माणसांचे सांगाडे सापडले नंतर.
खिडकीबाहेरची ती हिरवी शेतं पाहताना मनात एक विचार ठाम होत गेला मला कोणत्याच एका विचारधारेचं व्यसन कधीच लागलं नाही आणि लागूही नये असं मला वाटतं.
खरं सांगायचं तर माझ्या मनाच्या वेगवेगळ्या कप्प्यांत वेगवेगळे विचारवंत आरामात नांदतात कार्ल मार्क्सचा वर्गसंघर्षाचा विचार मनाला पटतो, बुद्धाची करुणा आणि शांती आवडते, बाबासाहेबांचा माणुसकीचा विचार श्वासासारखा जवळचा वाटतो. आणि त्यात भर म्हणून चार्वाक तो भारतातला पहिला बंडखोर तत्त्वज्ञ, जो दोन हजार वर्षांपूर्वी सांगत होता की इहलोकातलं जगणं हेच सत्य आहे, स्वर्ग नरकाच्या भ्रमात वेळ घालवू नको, "यावत् जीवेत् सुखं जीवेत्" जगशील तोपर्यंत सुखाने जग. आणि ओशो ज्यांनी सगळ्या बंधनांना, सगळ्या ठोकळेबाज विचारांना आयुष्यभर आव्हान दिलं, जे म्हणाले की स्वतःचा प्रकाश स्वतःच हो.
या सगळ्यांपैकी कोणाची एकट्याची एजन्सी मी घेत नाही. कारण जो एकाच विचारात अडकतो तो विचार करणं बंद करतो आणि विचार करणं बंद झालं की माणूस धोकादायक होतो. पोल पॉट याचं सर्वांत मोठं उदाहरण. एका अर्धवट समजलेल्या मार्क्सवादाला डोक्यात घोळवत त्याने लाखो माणसं संपवली.
माझी एकच विचारधारा आहे जगा आणि जगू द्या. चार्वाक सांगतो तसं सुखाने जगा, ओशो सांगतो तसं स्वतंत्रपणे जगा, बुद्ध सांगतो तसं करुणेने जगा आणि बाबासाहेब सांगतात तसं माणुसकीने जगा. या चारांचं एकत्र रसायन म्हणजे माझं तत्त्वज्ञान. कुठला एकच धागा पकडून त्याने विश्व बांधायला जाणं हे मला कधीच जमलं नाही, आणि जमवायचंही नाही.
आणि हो त्या क्षणी मी मनात एक आणखी गोष्टीबद्दल देवाचे मनापासून आभार मानले. कारण पोल पॉटच्या त्या विकृत विचारानुसार चष्मा घालणारा माणूस म्हणजे बुद्धिजीवी, आणि बुद्धिजीवी म्हणजे संपवण्याचा उमेदवार. आणि त्यात मी म्हणजे डोळ्यांवर जाडजूड चष्मा घालणारा, कपाळावर विचारांच्या आठ्या. चेहऱ्यावर एक गंभीर, खोल विचारात गढलेला भाव म्हणजे दिसायला तरी बुद्धिजीवी वाटणारा म्हणजे पोल पॉटच्या यादीत अग्रस्थानी बार झालं पोल पॉट अगोदरच गेला नाहीतर कंबोडियात माझी entry आणि exit एकाच दिवशी झाली असती आणि ती exit Angkor Wat पाहून नाही तर वेगळ्याच कारणाने झाली असती!
बाकी सगळ्या विचारधारा माणसांनी माणसांसाठी बनवल्या माणसांना संपवण्यासाठी नाही. जेव्हा कोणती विचारधारा माणसाला संपवायला निघते तेव्हा ती आधीच मेलेली असते, फक्त तिला ते कळलेलं नसतं.
पण खरी गोष्ट सुरू व्हायची होती ती हॉटेलमध्ये पोचल्यावर.
City Angkor Hotel भव्य, जुनं आणि... एकटं
Booking.com वर हॉटेल शोधताना City Angkor Hotel दिसलं होतं. फोटोत जुन्या खमेर वास्तुशैलीत बांधलेलं, सागवानी लाकडाचं भव्य इंटेरियर, प्रशस्त खोल्या आणि किंमत बघता बघता बोट क्लिक झालं. बुकिंग झालं.
Siem Reap येथे दुपारी ३ च्या सुमारास पोचलो आणि अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेलवर जाण्यासाठी Grab बुक केली आणि हॉटेलवर पोचलो.
बाहेरून पाहताच लक्षात आलं हे काही साधं हॉटेल नाही. शंभरहून अधिक खोल्यांची ती भव्य इमारत. प्रवेशद्वारावरच जुन्या खमेर शैलीतील कोरीव काम. आत शिरलो तर सागवानी लाकडाचं ते दालन छत उंच, जणू एखाद्या जुन्या राजवाड्यात आल्यासारखं वाटलं.
चेक-इन चे सोपस्कार पूर्ण करून रूम मध्ये पोचलो आणि आत जे दिसलं त्याने क्षणभर विसरलो की मी एकटा आहे. संपूर्ण खोली सागवानी लाकडाची बेड, टेबल, खुर्ची, कपाट, फ्रेम्स सगळं सागवान. जमीनही लाकडाचीच, त्यामुळे चालताना एक विशिष्ट क्रिक-क्रिक आवाज येत होता. खोलीत एक स्वतंत्र हॉल होता, बेडरूम वेगळं, आणि बाथरूममध्ये चक्क बाथटब. भिंतींवर खमेर शिल्पांचे अलंकार. जणू एखाद्या खमेर राजाची विश्रामकक्षच.दिवसभराचा प्रवासामुळे लगेच अलार्म लावून झोपून गेलो.
फ्रेश होऊन संध्याकाळी सात वाजता Grab बुक केली आणि खाली रेसेपशन मध्ये वाट बघत विचारले सहज विचारलं "आज किती गेस्ट आहेत?"
रिसेप्शनिस्ट हसला. म्हणाला "Only you, sir."
फक्त मी. शंभरहून अधिक खोल्यांच्या त्या भव्य हॉटेलमध्ये एकटा एकच गेस्ट.
मग Pub Street कडे निघालो. सिएम रीपमध्ये Grab हे अगदी आपल्या रिक्षासारखंच कुठेही, केव्हाही, झटक्यात हजर.
पब स्ट्रीटवर पोचलो आणि जणू वेगळ्याच जगात आलो. रंगीबेरंगी दिवे, संगीत, पर्यटकांची गर्दी, रेस्टॉरंट्स, बार
फिरता फिरता एक पाटी दिसली Indian Restaurant.
आत शिरलो. मालक एक भारतीय गृहस्थ चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा, डोळ्यांत एक वेगळीच चमक. गप्पा सुरू झाल्या आणि कळलं की ऐंशीच्या दशकात ते जगभर फिरले होते एकट्याने, पाठीवर bag टाकून, जसं त्या काळी फारसं कुणी करायचं नाही. भिंतींवर त्या प्रवासाचे फोटो लावलेले वेगवेगळ्या देशांतले, वेगवेगळ्या माणसांसोबतचे. प्रत्येक फोटोमागे एक कहाणी.
परदेशात एकट्याने भटकताना अचानक एक ओळखीचा माणूस भेटावा तसं वाटलं. घरच्यासारखं. जेवण साधं होतं, पण त्या गप्पांनी मन भरलं.
रात्री साडेअकरा वाजता Grab बुक करून हॉटेलकडे परतलो.
आणि सुरू झाला खरा थरार
सिएम रीपमध्ये पब स्ट्रीटच्या परिसराबाहेर पडलं की शहर एकदम सामसूम होऊन जातं. बँकॉकसारखी रात्रभर जागती शहरं आपल्याला एक चुकीची सवय लावतात. इथे रात्री अकरानंतर रस्ते ओस पडतात. दुकानं बंद, दिवे मंद, माणसं नाहीत. Grab ची गाडी हॉटेलजवळ थांबली आणि ड्रायव्हर निघून गेला.
मी एकटाच हॉटेलच्या आवारात उभा.
आजूबाजूला चिटपाखरूही नाही. हॉटेलचं मोठं आवार, मंद प्रकाश, आणि त्या विस्तीर्ण शांततेत फक्त माझ्या पाऊलांचा आवाज.
रिसेप्शनकडे गेलो तिथे कुणीच नव्हतो.
जवळपास पंधरा मिनिटे त्या रिकाम्या लॉबीत थांबलो, आवाज देत राहिलो. शेवटी कुठूनतरी एक झोपाळलेला रिसेप्शनिस्ट प्रकट झाला, चाव्या दिल्या आणि परत गायब झाला.
मी लिफ्टकडे निघालो.
लिफ्टमधून माझ्या मजल्यावर उतरलो. लिफ्टचं दार उघडलं आणि समोर काळाकुट्ट अंधार.
एक पाऊल टाकलं सेन्सर लाईट पेटला. आणखी एक पाऊल पुढचा सेन्सर लाईट पेटला. मागचा बंद. म्हणजे मी चालत जाईन तसतसे दिवे पेटत जात होते आणि मागे अंधार होत होता.
आधीच त्या रिकाम्या हॉटेलमध्ये मी एकटा, मनात थोडी भीती होतीच त्यात हे सेन्सर लाईट्सचं नाटक.
पण खरा धक्का पुढे होता. त्या सेन्सर लाईटच्या प्रकाशात कॉरिडॉरच्या जमिनीवर सरपटत असणाऱ्या पाली भिंतीच्या सावलीत शांतपणे बसलेल्या. माझ्या पाऊलांचा आवाज आणि अचानक उजेड आल्यावर त्या एकाएकी सरसर करत भिंतींवर चढायला लागल्या. एकीमागून एक.
त्या क्षणाचं वर्णन करणं शक्य नाही. पोटात गोळा आला. पण थांबणं शक्य नव्हतं मागे अंधार होता, पुढे खोली होती. मी वेगाने चालत खोलीचं दार उघडलं आणि आत शिरलो.
दार बंद केलं.
आतमध्ये त्या सागवानी खोलीची ती मंद प्रकाशातली भव्यता जी काही मला दुपारी सुंदर वाटली होती, ती आता पुराणी हवेली, दरवाजा, या सारख्या रामसे ब्रदर च्या हिंदी भयपटातील खोली वाटू लागली. लाकडी जमिनीचा तो क्रिक-क्रिक आवाज, भिंतींवरच्या खमेर शिल्पांच्या सावल्या. आयुष्यात पहिल्यांदा भीती कशी वाटते याचा अनुभव आला.
मी झोपायचा प्रयत्न करू लागलो परंतु काही केल्या झोप येईना, कदाचित दुपारी घेतलेल्या पॉवर नॅप ची कमाल असेल अथवा माझ्या मनातील भीतीची कमाल असेल पण झोप काही येईना.
शेवटी उठलो, दाराशी एक जड लाकडी खुर्ची ओढून ठेवली का? हे विचारू नका. मनाला समाधान हवं होतं. आणि मग अंथरुणावर पडून राहिलो. रात्रीचे तीन वाजेपर्यंत झोप नाही.
मग लक्षात आलं उद्या पहाटे साडेचार वाजता उठायचंय. Klook वर Angkor Wat sunrise tour बुक केला होता.
अलार्म लावला. डोळे मिटले.
साडेचार वाजले.
दीड तासाची झोप. डोळे जड, अंग जड. पण त्या क्षणी एकच विचार मनात आला चेंबूरच्या त्या रद्दीवाल्याकडे नॅशनल जिओग्राफिकमध्ये पाहिलेली ती मंदिरं आज डोळ्यांसमोर असणार.
उठलो. गरम पाण्याने आंघोळ केली. रेडी झालो.
हॉटेलच्या लॉबीत खाली आलो तिथे मिनिव्हॅन उभी होती. आत बसलो. गाडी निघाली. बाहेर अजून अंधार होता, सिएम रीपचे रस्ते सामसूम होते.
Angkor Wat च्या मुख्य दरवाज्यापाशी पोचलो, तिकीट काढलं आणि आत गेलो. Sunrise Spot कडे निघालो.
आणि तिथे पाहिलं तर काय अक्षरशः जत्रा. आपल्या मराठीत ज्याला जत्रा म्हणतो तीच. जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले शेकडो पर्यटक camera, tripod, selfie stick एकाच दिशेने तोंड करून उभे. सगळे एकाच गोष्टीची वाट पाहत होते.
सूर्योदय.
हळूहळू आकाश नारिंगी झालं. आणि त्या नारिंगी आकाशाच्या पार्श्वभूमीवर अंगकोर वाटची पाच शिखरं हळूहळू आकार घेऊ लागली.
मी थांबलो.
लहानपणी चेंबूरच्या त्या रद्दीवाल्याकडे नॅशनल जिओग्राफिकमध्ये पाहिलेला तो फोटो तोच क्षण आत्ता माझ्या डोळ्यांसमोर जिवंत होत होता.
बाराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारण इसवी सन ११३० च्या आसपास खमेर सम्राट सूर्यवर्मन द्वितीय याने हे मंदिर बांधायला सुरुवात केली. त्याने जे स्वप्न पाहिलं ते म्हणजे जगातील सर्वांत भव्य मंदिर उभारणं.
आणि ते स्वप्न त्याने पूर्ण केलं.
१६२ हेक्टर म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं क्षेत्रफळ. एकट्या मंदिर परिसराचा विस्तार एवढा की त्यात एक छोटं शहर मावेल. भोवताली विस्तीर्ण खंदक
जो सागरी महासागराचं प्रतीक आहे. आणि मध्यभागी ती पाच शिखरं मेरू पर्वताचं प्रतीक. हिंदू विश्वरचनेनुसार मेरू पर्वत हे देवांचं निवासस्थान, विश्वाचा केंद्रबिंदू. सूर्यवर्मनने पृथ्वीवरच एक मेरू उभारला.
एक मजेदार गोष्ट खमेर साम्राज्यातील आधीची बहुतेक राजकीय मंदिरे शिवाला समर्पित होती. पण सूर्यवर्मनने वेगळा विचार केला त्याने हे भव्य मंदिर विष्णूला समर्पित केलं. आणि त्याच विष्णूचं मंदिर आज कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर आहे जगात कदाचित हाच एकमेव देश असेल ज्याच्या राष्ट्रध्वजावर एखाद्या मंदिराचं चित्र आहे.
इथे संपूर्ण भिंती शिल्पांनी व्यापलेल्या. शेकडो मीटर लांब भिंतींवर एकसंध कथा कोरलेल्या.
रावणाने सीतेचं हरण, रामाने लंकेवर केलेलं आक्रमण, हनुमानाची झेप. हे सगळं इथे, कंबोडियाच्या मातीत, खमेर शिल्पकारांच्या हातून.
महाभारत कुरुक्षेत्राचं युद्ध, धर्म आणि अधर्माचा तो महासंग्राम.
समुद्रमंथन देव आणि दानव एकत्र येऊन अमृत काढण्यासाठी केलेलं ते महाकार्य. एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दानव, मध्ये वासुकी नाग, आणि त्या मंथनातून निघणारं अमृत हा संपूर्ण प्रसंग एका भिंतीवर इतक्या सजीवपणे कोरलेला की प्रत्येक पात्राचा चेहरा, प्रत्येक पात्राचा भाव वेगळा.
धर्म बदलला, मंदिर टिकलं
बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्या शतकात खमेर साम्राज्यात हळूहळू बौद्ध धर्माचा प्रसार झाला. एका पिढीत हिंदू मंदिर असलेलं अंगकोर वाट बौद्ध मंदिर म्हणून वापरलं जाऊ लागलं. विष्णूच्या मूर्तींच्या जागी बुद्धाच्या मूर्ती आल्या.
अंगकोर Wat हे एकमेव असं मंदिर आहे जे कधीही पूर्णपणे सोडलेलं गेलं नाही. शेजारची इतर मंदिरे ओस पडली, जंगलात गडप झाली पण अंगकोर वाट मात्र अखंड जिवंत राहिलं. कारण इथे नेहमीच कोणी ना कोणी प्रार्थना करत राहिलं.
पंधराव्या शतकात खमेर साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. शेजारील राज्यांशी युद्धे, व्यापारी मार्गांतील बदल, पर्यावरणीय संकटे आणि हळूहळू अंगकोर शहर ओस पडलं. लोक दक्षिणेकडे गेले, नवीन राजधानी वसवली.
पण जंगलाने मात्र अंगकोरला सोडलं नाही. हळूहळू झाडांनी, वेलींनी, मुळांनी ती मंदिरे कवटाळली. Ta Prohm सारख्या मंदिरात तर आज वटवृक्षांची मुळे भिंतींमधून आत शिरली आहेत दगड आणि झाड यांचं एक विचित्र, सुंदर आलिंगन.
सोळाव्या शतकात काही युरोपियन प्रवाशांनी या मंदिरांचा उल्लेख केला पण जगाला खऱ्या अर्थाने अंगकोर माहीत झालं ते १८६० च्या दशकात, फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञ Henri Mouhot यांच्या लेखनामुळे. त्यांनी जे वर्णन केलं ते वाचून युरोप अवाक झाला जंगलात लपलेलं एक महाकाय, भव्य मंदिर, ग्रीक आणि रोमन स्थापत्यकलेशी तुलना करता येईल असं.
मग सुरू झाले फ्रेंच पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे उत्खनन आणि जीर्णोद्धार. आणि १९९२ मध्ये UNESCO ने अंगकोरला World Heritage Site म्हणून मान्यता दिली.
Guided Tour असल्यामुळे Angkor Thom, Bayon, Ta Prohm सगळं पाहिलं. पण guided tour चा एक मोठा तोटा असतो "चला, वेळ नाही" हे वाक्य सतत कानावर पडत राहतं.
Bayon मधले ते रहस्यमय हसरे चेहरे दगडात कोरलेले, चारही बाजूंनी पाहणारे, एक गूढ स्मित ओठांवर ठेवलेले. त्या चेहऱ्यांसमोर जास्त वेळ थांबायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं पण guide च्या "Next stop!" ने त्या संवादावर पडदा पडला.
Ta Prohm मध्ये वटवृक्षांनी कवटाळलेल्या त्या भिंती पाहताना मनात आलं निसर्ग आणि मानव यांच्यातील हा संघर्ष की सहजीवन? झाडाने भिंत तोडली की भिंतीने झाडाला थांबवलं? दोन्ही एकमेकांत इतके गुंफले आहेत की आता वेगळे करणं शक्य नाही आणि कदाचित ते वेगळे करायला नको पण.
संध्याकाळी हॉटेलवर परतलो. त्या सागवानी खोलीत अंथरुणावर पडलो. दीड तासाची झोप, सारा दिवस भटकंती, डोळे जड होते.
पण मन मात्र अजूनही त्या भिंतींवरच्या रामायणाशी, त्या हसऱ्या चेहऱ्यांशी, त्या वटवृक्षांच्या मुळांशी बोलत होतं.
चेंबूरच्या त्या रद्दीवाल्याकडे नॅशनल जिओग्राफिकमध्ये पाहिलेलं ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं.
दाराशी खुर्ची ठेवली नाही त्या रात्री. कारण अंगकोर वाट पाहून आलेल्या माणसाला भुताचीही भीती वाटत नाही.
















































No comments:
Post a Comment