Wednesday, 2 July 2025

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप ब्लॉग: भाग एक

चेंबूर ब्रिज जवळ एक रद्दीवाला होता म्हणजे रूढ अर्थाने तो जुनी पुस्तके कधी रद्दीच्या भावात तर कधी २५-३०% ने विकत घ्यायचा आणि ती जुनीच पुस्तके विद्यार्थी किंवा दर्दी वाचकांना वाढीव किमतीत विकायचा, त्याच्याकडे पुस्तकांचा आणि मॅगझिन्स चा संचय अफाट होता आणि तो ती पुस्तके त्यांच्या प्रकारानुसार व्यवस्थित लावूनही ठेवायचा. त्याच्याकडे नॅशनल जिओग्राफिक च्या मासिकांचा संच पण असाच लावून ठेवलेला असायचा आणि मी त्यातील फोटोग्राफी साठी ती मॅगझिन्स चाळत थांबायचो. असेच एकदा नॅशनल जिओग्राफिकची जुनी कॉपी हाती लागली ज्यामध्ये अंगकोर वट येथील मंदिराचे चे  फोटो आणि माहिती होती, जगातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर तिकडे लांब कंबोडिया नामक देशामध्ये आहे माहिती वाचून आणि फोटो पाहून मी थक्क झालो होतो आणि ठरवलं कि एके दिवशी या ठिकाणी आपण जाऊया.


मग शाळा झाली, कॉलेज झाले, जगरहाटीप्रमाणे अगोदर कामधंधा शोधायचा ते झाले, मग यथावकाश लग्न झाले, मग चिमु झाला, मग करोना झाला, मग हर्षु झाला, असाच वेगाने काळ कोणासाठी न थांबता आपल्या गतीने चालत होता, आणि येके दिवशी १ मार्च २०२५ मध्ये मी कामानिमित्त इंडोनेशिया मध्ये दाखल झालो, इंडोनेशियाचा हा माझा दुसरा दौरा होता, पहिल्या दौऱ्यात मी योग्यकर्ता येथील प्रम्बनन येथील भव्य मंदिरे पाहिली होती, बाली ला पण जाऊन आलो होतो त्यामुळे मला कंबोडिया खुणावू लागला होता. ऑफिस चे काम झाल्यावर मी जकार्ता ते बँकॉक चे तिकीट काढले, थायलंड ला भारतीय लोकांना व्हिसा ची गरज नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट थायलंड ला जाऊ शकता. जकार्ता मध्ये असतानाच कंबोडियाच्या evisa अर्ज केला आणि जकार्ता वरून  बँकॉकला जायचं मग तिथून आपण बस मार्गे कंबोडिया गाठू हे ठरवले. समजा आपल्या कंबोडिया चा evisa वेळेत भेटला नाही तर मग थायलंड मध्येच आपण अयोध्या आणि सुखोथाई या दोन शहरांना भेट द्यायची असा प्लॅन बी पण रेडी केला. 

https://youtube.com/shorts/2WFjjZQUEK0?si=ys2aiurpD6mfKcoB

जकार्तावरून विमानातून थेट स्वर्णभूमी हे संस्कृत नाव धारण केलेल्या बँकॉकच्या अत्याधुनिक विमानतळावर उतरलो, विमानतळाचा वायफाय वापरून  GRAB हे उबेर सारखेच अँप डाउनलोड करून विमानतळावरून थेट हॉटेलवर पोहोचलो. बॅग्स वैगैरे ठेवल्या, फ्रेश झालो आणि जकार्ता मध्येच klook नावाचे अँप वापरून बँकॉक मध्ये -प्रसिद्ध असलेली चाओ फ्राया नदीवरची रिव्हर क्रूझ सफर बुक केली होती, ही आलिशान क्रूझ आयकॉनसियाम मॉलपासून निघते आणि माझ्या हॉटेल पासून त्या मॉल चे अंतर होते ९ किमी आणि मला तिथे पोहचायचे होते ३० मिनिटात, बँकॉकच्या कुप्रसिद्ध ट्रॅफिक मध्ये वेगाने जाता यावे म्हणून grab वरून बाईक बुक केली आणि जो थरार अनुभवाला तो वेगळाच होता. झिगझॅग करत त्या बँकॉक च्या ट्रॅफिक मधून सुसाट सुटलेला तो किरकोळ शरीरयष्टीचा पण काटक असलेला थाई माणूस आणि पाठीमागे जीव मुठीत घेऊन बसलेला अवजड भारतीय माणूस हे दृश्य बघण्यासारखे होते. एकदाचा वेळेत त्या आयकॉनसियाम नामक भव्य शॉपिंग मॉल मध्ये पोचलो आणि जीव भांड्यात पडला. क्रूझवर चढलो तेंव्हा माहोल सगळा बघण्यासारखा होता लक्झरी बोट, मंद प्रकाश, आणि नदीवरून येणारी थंड हवेचं झुळूक त्या दमट वातावरणात मन प्रफुल्लित करत होती. वर बोटीवर गेलो तर समोरच राजेशाही थाटाचा बुफे मांडलेला, टायगर प्रॉन्स, क्लॅम्स म्हणजे शिंपले, थाई ग्रीन चिकन करी, ग्रिल्ड फिश, टॉम याम सूप, रेड करी,  विविध प्रकारचे सॅलड्स, अशी खाद्यपदार्थांची रेलचेल आणि सोबतीला आवडत्या सुशीचे ५-६ प्रकार मग काय मुन्शी प्रेमचंद यांच्या कफन या कादंबरीमध्ये माधव आपला मुलगा घिसू याला गावाच्या ठाकूर च्या लग्नात किती खाल्लं याच वर्णन करताना सांगतो कि "इतना खाया कि पानी न पीया गया!" सेम विथ मी. 




बँकॉक येथील ग्रँड पॅलेस चे आवार









चाओ फ्राया नदीवरची रिव्हर क्रूझ


जेवण झाल्यावर निवांतपणे बोटीच्या अप्पर डेकवरून रात्रीचा बँकॉकचं ते रात्रीच जादुई रूप पाहत बसलो. रात्रीची वेळ होती आणि चाओ फ्राया नदीच्या काठावरचं बँकॉक म्हणजे जणू स्वप्नातलं शहर वाटत होत, आपल्या सूर्य देवताचे नाव धारण करणाऱ्या वॉट अरुण मंदिराचा सोनेरी प्रकाश आणि त्याच्या बरोबर विरुद्धदिशेला असलेल्या थाई राजपरिवाराचे निवास स्थान असलेले ग्रँड पॅलेस ची चमक सोबतीला आधुनिक स्कायस्क्रेपर्सचं रंगीत रिफ्लेक्शन या मुळे नदीमधला तो प्रवास अविस्मरणीय झाला. बऱ्याच सेल्फी, आणि फोटोग्राफी करून १ तासानंतर बोटीने परत एकदा आयकॉन सियाम या मॉल जवळ सोडले. आता परत हॉटेल ला जायचे होते आणि वेळेचे तसे बंधन नव्हते त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेचा आपण वापर करूया म्हणून मॉल च्या लगतच असलेल्या मेट्रो सेवेचे अति सूक्ष्म रूप म्हणता येईल किंवा मुंबई मध्ये असलेल्या मोनो रेल पेक्षा हि लहान अशी गोल्ड लाईन जी केवळ ३ स्टेशन च्या दरम्यान चालते त्या मध्ये बसून krung Thon Buri हे स्थानक गाठले आणि मग तिथून परत एकदा इंटरचेन्ज करून मेट्रो ने हॉटेल वर पोचलो.  


रात्रीच्या प्रकाशात उजळलेलं वट अरुण मंदिर – एक दिव्य आणि शांत अनुभव!

रात्री झोपेत पण मला अंगकोर वाट च्या मंदिरांची स्वप्ने पडली, अलार्म लावून पहाटे ५ वाजता उठलो, बॅग्स वैगैरे रात्रीच पॅक करून ठेवल्या होत्या त्या मुळे उठल्या बरोबर गरम पाण्याने आंघोळ करून, रेडी होऊन खाली हॉटेल लॉबी मध्ये पोचलो. सिएम रीप ला जाणारी बस सकाळी ७ वाजता होती आणि हॉटेल पासून बस स्थानकाचे अंतर ५-६ किमी होते आणि सकाळी बँकॉक च्या कुप्रसिद्ध अश्या ट्रॅफिक जॅम चा पण एवढ्या सकाळी सामना होणार नव्हता त्यामुळे हॉटेल मधून नाश्ता करून निघालो. 


बरोबर वेळेवर बस आणि बस मध्ये जाऊन स्थानापन्न झालो, बाकी कंबोडिया ला जाण्यासाठी बस निवडण्याचे कारण म्हणजे डायरेक्ट विमानाने जाणे आणि बस ने जाणे यात खूप जास्त फरक होता आणि बँकॉक ते सिएम रीप मधले अंतर फक्त ४०० किमी होते आणि मलाही पहिल्यांदा दोन देशामधील बॉर्डर बस ओलांडण्याचा अनुभव घ्यायचा होता. पूर्व-दक्षिण आशियाई देशामध्ये जायंट आयबिस हि खरेतर चीन ची असलेली कंपनी दोन देशांच्या सीमापार आपली बस सेवा देते. बस आरामदायी होती, जणू लांब प्रवासासाठी खास बनवलेली. मऊ सीट्स, वाय-फाय आणि थंडगार ऐसी परत बस मध्ये विमानांमध्ये कशी हवाई सुंदरी असते तशीच बस सुंदरी होती, तिने सगळ्यांचे पासपोर्ट चेक करून जे काही पाश्चिमात्य देशातील पर्यटक होते त्यांना विसा ऑन अरायव्हल ची प्रोसेस सांगत होती. बस मध्ये माझ्या शिवाय दुसरा कोणीही भारतीय पर्यटक नव्हता, तिने मला सांगितले कि भारतीय पर्यटकांना इम्मीग्रेशन मध्ये प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही रेडी राहा, हो म्हणून मी बस च्या प्रवासाचा आनंद घेऊ लागलो. बस मध्येच त्यांनी iced कॉफी आणि बन पाव दिला आणि एक पाणी बाटली दिली. आठ तासांचा प्रवास सुरु झाला, रस्त्यांची स्थिती अतिशय उत्तम असल्यामुळे आदळआपट होत नव्हती, कडेने थायलंडची हिरवीगार शेतं आणि छोटी गावं डोळ्यांना सुखावत होती. आणि मग आली थायलंड आणि कंबोडिया या देशाची बॉर्डर पोस्ट पोईपेट हे शहर. बस थांबली आणि आम्ही सगळे बस मधून उतरलो आता सगळ्यांना एक-एकट्याने सीमा पार करायची होती, धूळ, गोंधळ आणि लोकांची आरडाओरड यात मी थायलंड ची सीमा पार केली आणि दोन्ही देशात असलेल्या नो मेन्स लँड मधून आता कंबोडिया च्या सीमेवर हजर झालो, आणि तिथे जात असतानाच मी कुठे आलोय बघावं म्हणून गूगल बाबा वर शोध घेतला तर लक्षात आले कि हेच ते पोई पेट शहर आहे  जिथे चिनी स्कॅम सेंटर्स मध्ये हजारो भारतीयांना बनावट जॉब ऑफर्स देऊन फसवलं जातंआणि तुरुंगासारख्या कॉल सेंटर्समध्ये डांबून ठेवलं जातं. मी एकटाच होतो, त्यामुळे थोडं सावध होतो. माझ्याकडे आधीच कंबोडियाचं eVisa होता, म्हणजे मी विचार केला, "बस, पासपोर्ट दाखवायचा, त्यावर ते लोकं स्टॅम्प मारतील, आणि मी कंबोडियात! पण नाही, हि बॉर्डर म्हणजे एक वेगळाच खेळ आहे, आणि त्यातही मी भारतीय म्हटल्यावर एक अनपेक्षित ट्विस्ट मिळाला – इमिग्रेशन ऑफिसरचा ‘इंटरव्ह्यू’! eVisa असूनही ‘इंटरव्ह्यू’ का? मी पोई-पेट बॉर्डरवर पोहोचलो तेव्हा थायलंडच्या बाजूला सगळं सोपं गेलं – पासपोर्ट दाखवला, स्टॅम्प पडला, आणि बाहेर पडलो. पण कंबोडियाच्या इमिग्रेशन ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच मला थोडं वेगळं वाटलं. माझं eVisa होतं, म्हणून मी लाइनमध्ये उभा राहिलो. पण जेव्हा माझी वेळ आली, तेव्हा ऑफिसरनं माझा पासपोर्ट पाहिला आणि म्हणाला, "इंडियन? ओके, बाजूला थांबा!" मी मनातल्या मनात विचार केला, "अरे, हे काय नवीन नाटक आहे? माझं eVisa आधीच अप्रूव्ह झालंय, मग आता काय बाकी आहे?" मग मला एका छोट्या खोलीत घेऊन गेले आणि तिथे एक ऑफिसर बसला होता जणू काही जॉब इंटरव्ह्यूसाठी आलोय! त्यानं मला प्रश्नांची सरबत्ती सुरू केली "कंबोडियात का आलायस? किती दिवस राहणार? कुठे जाणार? तुझा प्लॅन काय आहे? " मी शांतपणे सांगितलं, "अंगकोर वाट पाहायला आलोय, सिएम रीपला जाणार, फक्त टुरिस्ट आहे मी!" पण तो थांबेचना – "तुझ्याकडे रिटर्न तिकीट आहे का? हॉटेलचं बुकिंग दाखव!" मी सगळं दाखवलं, पण त्याच्या चेहऱ्यावर संशयाचा भाव होता, जणू मी एखादा गुप्तहेर आहे आणि मंदिरं पाहणं हे फक्त एक बहाणा आहे! चिनी माफिया आणि भारतीयांचं कनेक्शननंतर मला कळलं की हे सगळं का घडत होतं. पोई-पेट हे बॉर्डर टाउन म्हणजे फक्त ट्रॅव्हल हब नाही, तर एक कुख्यात ठिकाण आहे जसं मी आधीच सांगितलं त्या प्रमाणे  इथे चिनी माफियांनी बेकायदा कॉल सेंटर्स उघडलेली आहेत! या कॉल सेंटर्समध्ये अनेक भारतीयांना बनावट जॉब ऑफर्स देऊन थायलंडमध्ये बोलावलं जातं – "हाय-पेइंग जॉब, फ्री राहणं, जेवण, सगळं मिळेल!" असं म्हणून त्यांना फसवलं जातं. पण एकदा का ते थायलंडमध्ये आले की त्यांना बॉर्डर ओलांडून कंबोडियात आणलं जातं आणि मग तिथे गुलामासारखं काम करायला लावलं जातं. हे कॉल सेंटर्स स्कॅमिंगसाठी चालतात जिथे लोकांना ऑनलाइन फसवून त्यांचे पैसे लुटले जातात.या सगळ्यामुळे कंबोडियाच्या इमिग्रेशन ऑफिसर्सना भारतीय ट्रॅव्हलर्सवर संशय येतो. त्यांना वाटतं की कदाचित मी असाच कोणीतरी आहे जो जॉबच्या बहाण्याने आलाय आणि आता इथे अडकणार! मी त्यांना माझ्या सगळ्या बुकिंग दाखवल्या आणि समजावले कि मी फक्त अंगकोर वाट पाहायला आलोय, माझा कॉल सेंटरशी काही संबंध नाही!" पण तरीही त्यांनी माझा पासपोर्ट तपासला, eVisa चेक केलं, आणि शेवटी २५-३० मिनिटांच्या चौकशीनंतर मला स्टॅम्प मारून सोडलं. मी बाहेर पडलो तेव्हा जीवात जीव आला, 


आता पुढे चालत जाऊन बस शोधायची होती जी बॉर्डर क्रॉस करून थांबली होती. तिथे गेल्या नंतर बाकी सगळे प्रवासी अगोदरच येऊन बसले होते आणि मी आल्याबरोबर आम्ही कॅबोडिया मध्ये निघालो. 




कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग दोन

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग एक बँकॉकहून Giant Ibis बस ने निघालेला मी त्या पोई पेटच्या बदनाम बॉर्डरवरचा इंटरव्ह्यू, कंबोडियन इमिग्रेशनची त...