ऐहोळे :

बेलूर, हळेबिडू, बेलवाडी, दोड्डागड्डावेल्ली आणि अर्शिकेरे येथील होयसाळ राजवंशाच्या काळातील मंदिरे बघून झाल्यानंतर त्या आठवणी जागवत बदामी या चालुक्यांच्या राजधानी कडे गोल गुम्बज या एक्सप्रेस ट्रेन ने निघालो, ट्रेन अर्शिकेरे वरून रात्री १० ला सुटते व बदामी मध्ये सकाळी ६:३० ला सोडते, बदामी रेल्वे स्टेशन हे बदामी शहरापासून अंदाजे २-३ किमी लांब आहे. रेल्वे स्टेशन वरून बदामी शहरात जाण्यासाठी टमटम माणसी १० रु. घेतात. मी टमटम पकडून बदामी बसस्टॅण्ड मध्ये आलो तिथून मी बुक केलेले हॉटेल KSTDC चे हॉटेल मयुरा चालुक्य हे बसस्टॅण्ड पासून अंदाजे १.५-२ किमी होते. एका मोटरसायकलला स्वाराने लिफ्ट दिली हॉटेल पर्यंत. हॉटेल रूम वर जाऊन आंघोळ करून तिथे उपलब्ध असलेला नाश्ता केला आणि लगेच ऐहोळे-पट्टडकल-बदामी-बनशंकरी या क्रमाने सगळी ठिकाणे बघायचे निश्चित करून हॉटेल मध्येच असलेल्या ट्रॅव्हल डेस्क वर कार रेंट चार्जेस विचारले, त्याने एका माणसाचे ही सगळी ठिकाणे दाखवायचे १८०० रुपये सांगितले. मी गूगल वर शोध घेतला असता सगळ्यात लांब ठिकाण हे ऐहोळे हे फक्त ३५ किमी लांब होते आणि बाकीचे ठिकाणे परत यायच्या मार्गावरच होती. बसस्टॅण्ड वर जाऊन ऐहोळे या ठिकाणी जाण्यासाठी बस आहे कि याची चौकशी केली असता १५ मिनिटात बस सुटणार आहे हे कळले मग सरळ बस मध्ये जाऊन बसलो ३५ रुपयांचे तिकीट काढून प्रवास आरंभ केला.
बदामी ते ऐहोळे हा रस्ता बाकी कर्नाटक मध्ये असलेल्या रस्त्या प्रमाणे छान आहे.
आता थोडे ऐहोले विषयी इसवी सनाच्या ५ व्या ते ८ व्या शतकापर्यंत चालुक्य राजवटीची राजधानी असलेले हे आजचे एक शांत खेडेगाव त्या काळातील महत्वपूर्ण राजधानीचे शहर होते आणि या ठिकाणावरूनच चक्क इराणशी म्हणजेच त्या काळच्या पर्शियाशी या राजवटीचा व्यापारउदीम चालत होता. संपूर्ण ऐहोळे गाव तुम्हाला पुरातात्विक दृष्ट्या अनमोल अश्या विविध मूर्ती आणि वस्तूंवर वसलेले दिसेल. गावात कोणाच्या अंगणात काही खांब दिसतील तर काही ठिकाणी जुन्या वास्तूचा उपयोग गावकरी त्यांच्या दैनंदिन कामासाठी करत असताना दिसतात. ऐहोळे हे खऱ्या अर्थाने भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्राची प्रयोगशाळा आहे हे म्हणाले तर वावगे ठरणार नाही एवढी विविध आकाराची मंदिरे या ठिकाणी ५-८ शतकात बांधली गेली आणि त्यातूनच भारतीय मंदिराची स्थापत्य शैली विकसित झाली.
No comments:
Post a Comment