Wednesday, 2 October 2024

भारताबाहेरील प्राचीन हिंदू मंदिरे - इंडोनेशिया प्रंबानन येथील मंदिरे

जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला, 17000 पेक्षा अधिक बेटांचा समूह असलेला इस्लामिक देश परंतू आपल्या समृद्ध हिंदू भूतकाळा विषयी आदरभाव बाळगून असलेला देश ज्यामुळेच आजही त्या देशाची राष्ट्रीय विमान सेवा देणारी कंपनी गरुडा हे विष्णूच्या वाहकाचे नाव धारण करते तर त्यांचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य "भिन्नेका तुंगगल इका" हे संस्कृत भाषेतून घेतले आहे एकंदरीत येथील संस्कृतीवरील हिंदु धर्माची छाप व यांच्या भाषेतली संस्कृत भाषेतील शब्दांची रेलचेल पाहून आपण थक्क होतो, तर मी गोष्ट सांगतोय इंडोनेशिया ची आणि तेथील ९व्या शतकातील मंदिर संकुल पाहण्यासाठी माझ्या झालेल्या चित्तर कथेची.




मुंबई विमानतळाच्या सुंदर अश्या टी-२ तेर टर्मिनल वरून इंडिगोची मुंबई - जकार्ता अशी विना-थांबा सेवा होती आणि स्वस्तही होती म्हणून तिचे तिकीट बुक करणे हे अव्यवहार्य ठरले. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणार असाल आणि तुमचा विमान प्रवास हा सहा तासापेक्षा जास्त असेल तर इंडिगो सारख्या भारतीय बजेट विमानसेवेने कधीच जाऊ नये असा माझा स्वतःचा अनुभव आहे. देशांतर्गत १-२ तासाच्या प्रवासासाठी बजेट विमानसेवा ठीक आहे परंतु जास्त कालावधीच्या प्रवासात इंडिगो मध्ये पाणी सुद्धा कपमध्ये मोजून ओतून देतात आणि त्यावर कहर म्हणजे त्यांचे प्रवासादरम्यान दिले जाणारे सँडविचेस वैगैरे तस्सम खाद्य पदार्थ. तर असो अश्या विमान कंपनीच्या कारभाराचा अनुभव घेत जकार्ता विमानतळावर पोचलो आणि बाहेर पडल्या बरोबर करन्सी एक्सचेंज करून तिथले सिमकार्ड विमानतळावरच घेऊन इंटरनेट ऍक्टिव्हेट करून घेतला.

जकार्ता हे इंडोनेशिया राजधानीचे शहर, या शहरात इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक म्हणून उभारलेले मोनास नावाचे स्मारक आहे. ते स्मारक बघण्यासाठी जाताना तेथील कुप्रसिद्ध वाहतूककोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून दुचाकी वरून फिरण्याचा आनंद घेतला













तर झाले असे कि जकार्ताला (इंडोनेशिया चे राजधानीचे शहर) पोचल्यावर हातात एक दिवस होता आणि तो दिवस हॉटेल वर लोळून काढणे हा जगमान्य पर्याय किंवा मग जवळपास ६०० किमी प्रवास करून प्रंबानन येथील मंदिरे बघणे हा दुसरा पर्याय. एवढी धावपळ म्हटल्यावर त्या अनुषंगाने होणारी दगदग होणार म्हणून मग हॉटेल वरच ३-५ असा आराम करत पडलो होतो मग अचानक निर्णय घेतला कि एवढ्या लांब आलोय तर मंदिरे बघूयाच.



शायद कल हो ना हो . मोबाईल मध्ये लोकल ओला/उबेर सारखे grab नावाचे अँप डाउनलोड केले आणि travelko नावाचे goibibo सारखे दुसरे अँप डाउनलोड केले आणि त्यावर शोध घेतला असता लक्षात आले कि प्रम्बनं मंदिर असलेले शहर म्हणजे योग्यकर्ता आणि तिथे जाणाऱ्या बसेस मी राहत असलेल्या ठिकाण पासून फक्त ४ वाजे पर्यंतच असतात, मग परत रेल्वेचा काही पर्याय आहे का ते शोधावे म्हटले आणि शोध घेतला असता मी राहत असलेल्या ठिकाणापासून सुमारे २० किमी अंतरावर एक रेल्वे स्टेशन होते आणि तिथून रात्री १०:३० वाजता योग्यकर्ता साठी ट्रेन आहे हे कळाले. ट्रेन आहे हे खरे पण आता ते तिकीट कसे बुक करावे या विवंचनेत असताना हॉटेल रेसेपशनिस्ट दृष्टीस पडली आणि तिला विचारले कि तू ऑनलाईन बुक कर मी तुला कॅश देईन त्या माउलीने लगेच हो म्हटले आणि अँप वर पेमेंट ऑपशन आल्यानंतर बघितले कि तिथे व्हिसा क्रेडिट कार्ड चे ऑपशन दिसत आहे मग मी तिला म्हटले माझ्या क्रेडिट कार्ड चे डिटेल्स टाकून बघूया आणि आश्चर्य म्हणजे तिकीट बुक झाले. फक्त एकच दिवस आपण योग्यकर्ता या शहरात राहणार म्हणून मग मी बॅकपॅक एक ड्रेस भरून घेतली आणि रात्री ९ वाजता grab नावाच्या अँप वरून bike बुक केली.
मी राहत असलेले हॉटेल हे औद्यौगिक परिसरातील होते आणि आपल्या कडे औद्यौगिक परिसरात रात्री असते तशीच शांतता येथे पण होती ९ वाजता सगळं सामसूम होते. आलेल्या बाइक रायडर ला मला जसा त्यांच्या bahasa या स्थानिक भाषेचा गंध नव्हता तसा त्याला हि इंग्रजीचा गंध नव्हता. म्हणून त्याला जास्त काहीच न बोलता गुपचूप त्याच्या मागे जाऊन बसलो आणि तो बरोबर जातोय का हे बघण्यासाठी मॅप लावला. जवळपास १०-१५ मिनिटे मॅप वर दाखवल्या प्रमाणे चालल्या नंतर अचानक त्याने रूट बदलला आणि अरुंद रस्ते असलेल्या झोपडपट्टी भागातून जाऊ लागला मी गोंधळात पडलो आणि घाबरलोपण, एकतर आपण परदेशात आणि या अनोळखी भागात कोण कसे असेल काय सांगायचे पण लगेच निश्चय केला कि हा कुठे थांबून दादागिरी करायला लागला तर मात्र याला सोडायचे नाही म्हणून तॊ कुठे जातोय हे मॅप वर बघत बसलो आणि सुदैवाने अवघ्या ५ मिनिटात तो मुख्य रोडवर आला आणि माझा जीव पण भांड्यात पडला.
सुखरूप पणे स्टेशन ला पोचल्यावर तिथे मोबाइल मधील तिकीट स्कॅन करून वैटिंग एरिया मध्ये गाडीची वाट बघत बसलो. मी ज्या स्टेशन वर आलो होतो ते जकार्ता च्या बाहेरील स्टेशन होते म्हणजे तुम्ही आपल्या कल्याण स्टेशन सोबत तुलना करू शकता, गाडी वेळेवर आली आणि AC प्रीमियम चा डबा शोधत पुढे गेलो आणि जसा डब्यात प्रवेश केला तास पहिला झटका बसला, मी बुकिंग करताना वाटले होते कि AC प्रीमियम चा डबा म्हणजे आपल्या येथील ३ tier AC सारखा असेल पण हा डबा तर चेअर कार निघाला आता पूर्ण रात्र बसून प्रवास करावा लागणार या विचारानेच शहारलो.
काही माणसे हि झोपेच्या बाबतीत खूपच सुखी असतात त्यांना कुठेही बसल्या बसल्या झोप लागते मला मात्र ते कधीच शक्य होत नाही मग काय पूर्ण रात्र जागून पहाटे ५:३० वाजता ट्रेन योग्यकर्ता या मध्य जावाच्या राजधानी मध्ये पोचली.




ट्रेन मधून उतरून बाहेर पडल्या नंतर आपल्या येथल्या प्रमाणे रिक्षावाले अंगावर धावून येतात तशे पण थोडे कमी आक्रमक पणे आले. त्यांना मानेनंच नकार देत स्टेशन पासून चालत जवळपास १ किमी अंतरावर असलेल्या मालिओबोरो या शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेल्या मार्गावर चालत निघालो, सकाळचे ६ वाजले होते त्यामुळें आरोग्याविषयी जागरूक नागरिक जॉगिंग करत होते आणि काही हौशे असाच फेरफटका मारत होते. त्या मार्गावर मार्ग क्रमानं करत असताना मी जवळपास हॉटेल्स कोणती आहेत हे शोधत एक हॉटेल गाठले आणि त्या हॉटेल वाल्याने चेक इन टाईम १२ चा आहे म्हणून सांगीतले मग मी त्याला फक्त १ तासा साठी हॉटेल पाहिजे म्हणून घासाघासी करून फक्त फ्रेश होवून येण्यासाठी ३०,०००/- रुपये इंडोनेशियाचे दिले.










फ्रेश होवून लगेच ७ वाजता हॉटेल मधून बाहेर पडलो, हॉटेल वाल्या मॅनेजर चे इंग्लिश यथातथाच होते, बाहेर आल्या नंतर एक हिजाब धारण केलेली स्त्री जॉगिंग साठी जाताना दिसली मग तिच्या कडे प्रम्बनान मंदिर आणि बोरोबुदुर ची चौकशी केली असता तिने अतिथी देवो भव हा भारतीय मंत्र अंगिकारत ओळखीच्या ४-५ टॅक्सी ड्रायव्हर ला फोन करून अतिशय वाजवी दरात टॅक्सी ठरवून दिली आणि मग तेथेच सकाळचा नाश्ता आटोपला. गाडी चालक बरोबर ८ वाजता गाडी घेऊन आला आणि आम्ही निघालो जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या प्रंबानन मंदिर बघण्यासाठी. मालिओबोरो पासून प्रंबानन मंदिर अंदाजे २० किमी अंतरावर आहे गाडी जशी चालू झाली तशी झोप न झाल्यामुळे डुलकी लागली जवळपास अर्धा तास झोपल्यानंतर अचानक ड्राइवर ने उठवून सांगितले कि आपण जवळ आलोय. जसे मंदिराची एक झलक बघितली तशी झोप तडीपार झाली आणि मग उतरल्या नंतर ४,००,०००/- इंडोनेशियन रुपये एवढी प्रवेश फी भरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला.








९ व्या शतकात बांधलेल्या प्रंबानन मंदिर परिसरात एकूण २४० मंदिरे बांधण्यात आली होती त्यात मुख्य आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि त्यांच्या वाहनांची म्हणजेच नंदी, गरुड यांची. सगळ्यात भव्यदिव्य मंदिर हे शिवाचे आहे जसे मी जवळ जवळ जात होतो तशी त्याची भव्यता अंगावर येत होती, शिव मंदिराच्या दोन्ही बाजूला ब्रह्मा आणि विष्णू मंदिरे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस पुराणातील तसेच रामायणातील कथा मूर्तींच्या रुपात कोरण्यात आल्या आहेत. अतिशय सुंदर असलेली ही मंदिरे पुढे मग जवळच असलेल्या मेरापी ज्वालामुखी च्या वारंवार होणाऱ्या उद्रेकामुळे आणि त्या मुळे येणाऱ्या भूकंपामुळे जी ओस पडली ती डच लोकांनी परत १९ व्या शतकात लक्ष दिल्यामुळे परत एकदा जगासमोर आली, आजही इंडोनेशियन सरकार अब्जो पैसे खर्च करत त्यांचा जीर्णोद्धार करत आहे.
















Friday, 1 May 2020

पट्टदकल



ऐहोळे येथील मंदिर स्थापत्य शास्त्राची प्रयोगशाळा बघितल्या नंतर मी निघालो चालुक्य राजवटीच्या राजधानीचे दुसरे शहर अर्थात पट्टदकल या गावी, याचा नेमका उच्चार कसा करायचा हेच मला कळत नव्हते त्यामुळे इंग्रजी pattadakal चा सरळ मराठी अनुवाद केला. पाठीवर एकच सॅक असल्यामुळे तसा म्हणायला गेल्यावर कुठेही फिरण्यास मोकळा होतो. ऐहोळे बघून बाहेर येणाऱ्या प्रत्येकास रिक्षावाल्यांनि गराडा घालून पट्टडकल येणार का असा एकच गलका सुरु केला. मी अगोदर ठरवून ठेवलेले वाक्य "आताच आलोय" सांगून सुटका करून घेतली. ऐहोळे ते पट्टदकल हे अंतर १६ किमी असून तुम्ही रिक्षा किंवा मग बस असे दोन्ही पर्याय निवडू शकता. मी एकटा असल्यामुळे बस चा पर्याय निवडून बस ची वाट बघत तिथेच ऐहोळे येथील चौकात चहा घेतला. लगेच बस आल्यानंतर मग पट्टदकल ला निघालो. २०-२५ मिनीटात आपण जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या या चालुक्यांचा द्वितीय राजधानीत पोचतो. या ठिकाणी हिंदू आणि जैन मंदिरांचा समूह आहे, बहुतेक मंदिरे शैव आहेत पण विष्णु या देवतेलाही मानाचे स्थान दिलेले आहे. येथील प्रमुख मंदिरांमध्ये आहेत 

१. विरुपाक्ष मंदिर   
२. मल्लिकार्जुन मंदिर 
३. जंबुलिंगेश्वर मंदिर 
४. संगमेश्वर मंदिर 
५. काशी विश्वनाथ मंदिर 
६. चंद्रशेखर मंदिर 
७. गलगनाथ मंदिर 
८. पापनाथ मंदिर 
९. जैन मंदिर 


















पूर्ण मंदिर परिसर पाहण्यासाठी २-३ तास पुरेसे आहेत, येथे फिरताना मंदिर स्थापत्य कला कशा प्रकारे विकसित झाली याची आपल्याला कल्पना येते. 

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग दोन

कंबोडियाची सोलो रोड ट्रिप: भाग एक बँकॉकहून Giant Ibis बस ने निघालेला मी त्या पोई पेटच्या बदनाम बॉर्डरवरचा इंटरव्ह्यू, कंबोडियन इमिग्रेशनची त...