बेलवाडी : हसन ला पहिली जाणारी बस आपल्याला पकडायची आहे हे मनाला बजावतच रात्री चित्रदूर्गमध्ये हॉटेलवर झोपलो आणि मग पहाटे ५ वाजता उठून आंघोळ वैगैरे आटोपून बरोबर ५:४५ ला बस स्थानकामध्ये आलो. हसन ला जाणारी पहिली बस ६:३० ला होती आणि तिथून मी हळेबिडू ला जायचे हे ठरवले होते. बस चालू व्हायच्या अगोदरच थेतील कॅन्टीन मध्ये टिपिकल साऊथ इंडियन नाश्ता उरकून घेतला आणि बस लागल्याबरोबर पटकन जागा पकडली, बस मध्ये बहुतेक प्रवासी हे कोणत्या तरी कॉलेज चे शिक्षक आणि बाकीचे ग्रामीण भागातील होते. गुगल वर हसन पर्यंतचे अंतर हे १८१ किमी दाखवत होते आणि वेळ ४ तास सांगत होते. सोबतच्या सीट वर जे गृहस्थ बसले होते त्यांच्याशी गप्पांच्या ओघात कळले कि हळेबिडू ला जाण्यासाठी हसन पर्यंत जाऊन परत हळेबिडू ला यायची गरज नाही, बनवरा नावाचे गाव आहे, तिथे उतरायचे आणि तिथून मग हळेबिडू ला जायचे, संपूर्ण परावासात नारळाची झाडेच झाडे दिसत होती आणि नंतर कळाले कि या भागात नारळाचे विक्रमी उत्पादन काढले जाते. बनवरा आल्या नंतर उतरलो आणि लगेच हळेबिडू ला जाणारी बस थांबली होती त्या मध्ये बसून गुगल मॅप मध्ये बघितले तर हळेबिडू च्या अलीकडेच १० किमी अंतरावर बेलवाडी हे माझ्या लिस्ट मधील गाव लागते मग मी लगेच हळेबिडू चे तिकीट न काढता बेलवाडी फाट्यापर्यंतचे तिकीट काढले आणि तिथून मग एका बाईक स्वाराची मदत घेऊन बेलवाडी गावात पोचलो तिथे पोचून त्यांची फेमस अशी फिल्टर कापी (कॉफी चे कन्नड नाव) पिल्यानंतर मंदिर कुठे आहे याची चौकशी केली. मंदिर तिथून जवळच होते. आता काही या मंदिराविषयी
मंदिरावर केलेली अद्भुत अशी शिल्पकला बघत बघत ३ वाजले अंग मी मुक्कामाचे माझे ठिकाण बेलूर ला जायचं आणि उद्या परत मग हळेबिडू, दोड्डगडावलू, अर्शिकेरे हि ठिकाणे बघून अर्शिकेरे या ठिकाणावरून बदामी ला जाण्यासाठी एक्सप्रेस पकडायची होती ज्याचे तिकीट मी अगोदरच काढून ठेवले होते.
हे मंदिर चिकमंगळूर जिल्ह्यात असून चिकमंगळूरपासून\२८ किमी तर हळेबिडू पासून १० किमी वर आहे. मंदिराची रचना हि त्रिकुट म्हणजे तीन मुख्य देवतांसाठी तीन गाभारे अश्या प्रकारची आहे. मुख्य मंदिरात जाण्याच्या अगोदर ज्या पायऱ्या आहेत त्याच्या दोन्ही बाजूला दोन सुरेख हत्ती दगडात कोरून बनवलेले ठेवलेले आहेत. आपण जसे जसे मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश करतो तसे आपले लक्ष वेधून घेतात ते सभामंडपात असलेल्या खांब, लेथ मशीन वर कोणीतरी त्यांना टर्निंग करून बनवले असावेत अशी त्यांची एकूण बनावट आहे. वीर नारायण मंदिर असे जरी या मंदिराचे नाव असले तरी मी आधी सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी एकूण ३ मुख्य देवतांचे गाभारे आहेत आणि या ३ गाभार्या मध्ये ज्या देवतांच्या मुर्त्या आहेत त्या संबंध भारतामध्ये सगळ्यात सुंदर असाव्यात, जवळपास ५-६ फूट उंचीच्या गंडकी नदीच्या पात्रात मिळणाऱ्या काळ्याभोर पाषाणात या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि त्यांची रचना एवढी परिपूर्ण पद्धीतीने केली गेली आहे कि आपण सगळं काही विसरून फक्त मूर्तीकडे पाहत असतो. मुख्य मूर्तींचे फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे मी फोटो काढले नाहीत. वीर नारायण, योग्य नरसिंह आणि वेणुगोपाल यांच्या मुर्त्या बघणे हा त्यातल्यातात एक अविस्मरणीय अनुभव आहे.









No comments:
Post a Comment